ठाणे : ठाणे शहर परिसरात मोटारसायकली तसेच सोनसाखळीची जबरी चोरी करणाऱ्या खालीद मुज्जमिल अली ऊर्फ निग्रो (२३, रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर भागातून नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी, मंगळसूत्र आणि पाच मोटारसायकली असा सात लाख ९० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या टोळीतील मुज्जमिल हा मुंब्रा बायपास सेवा रस्त्यावर येणार असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १४ जून रोजी मुंब्रा बायपास मार्गावर मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सापळा लावून खालीद मुज्जमिल आणि त्याचा साथीदार अरशद शेख (२०) या दोघांना अटक केली. त्यांची विनाक्रमांकाची एक मोटारसायकलही हस्तगत केली. त्यांच्या चौकशीतून ही दुचाकी चोरणारा रिजवान शेख (२०) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याच चौकशीतून या तिघांनी शहरातील वेगवेगळ्या भागात चोऱ्या केल्याचे उघड झाले. त्यांनी कापूरबावडी, कोपरी, कळवा आणि श्रीनगर अशा चार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या तसेच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्यांची जबरी चोऱ्या केल्याचीही कबुली दिली. या पथकाने त्यांच्याकडून चार लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यांच्यापैकीच रिजवान हा सराईत गुन्हेगार असून वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यात त्याला यापूर्वीही अटक झाली आहे. त्याने आतापर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तीन तर मानपाडा आणि कळवा पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रत्येकी एक गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून तीन लाख रुपयांच्या दुचाकी या पथकाने जप्त केल्या आहेत. या टोळीकडून चार जबरी चोऱ्या आणि पाच मोटारसायकलींच्या चोऱ्या अशा नऊ गुन्ह्यांची उकल झाल्याचे मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सांगितले. तिघांनाही १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.