डोंबिवली: शहरात लॉकडाऊन आधी रिक्षांच्या रांगांमुळे नागरिक हैराण असतांनाच आता दुचाकीस्वारांनी त्यांची वाहने कुठेही पार्क केल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेषत: पूर्वेकडील रामनगर भागात डॉ. राथ पथावर दुचाकींचे सर्रास पार्किंग झाले असल्याने रेल्वे स्थानकात जा ये करणा-या नागरिकांची अडचण झाली आहे.
राथ रस्त्यावर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे असून त्यापैकी रामनगर तिकिट खिडकी आणि मधल्या पादचारी पूलाच्या तिटिक खिडकी नजीकचे पाय-यांचे प्रवेशद्वार रेल्वे स्थानकात जाण्यासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे फलाटात जाण्यासाठी अत्यावश्यक सेवेच्या प्रवाशांना मधल्या पूलाच्या रॅम्पवरून जावे लागते. तेथे जाण्यासाठी दुचाक्यांचा अडथळा होत असल्याने ज्येष्ठ महिला पुरुष कर्मचा-यांची अडचण वाढली आहे. प्रवेश द्वारापर्यंत दुचाक्या अस्ताव्यस्त लावल्या होत्या, त्यामुळे मार्ग काढतांना समस्येत वाढ होत आहे.दुचाक्या पार्क करण्यासाठी नियमावली असावी अशी मागणी प्रवशांनी केली. तसेच प्रवेशद्वारासमोर वाहने पार्क करू नयेत असेही सांगण्यात आले.
स्कायवॉकची सुविधा तातडीने सुरु करावी अशी मागणी मानपाडा रस्त्यावरून येणा-या प्रवाशांनी केली. जेणेकरून पावसाच्या सरी आल्या तरी रेल्वे स्थानकात मधल्या पूलापर्यंत जाण्यासाठी आडोसा मिळतो. सध्या ती सेवा नसल्याने पाटकर रस्ता, तसेच राथ रस्त्यापर्यंत यावे लागते. त्यामुळे दुचाक्या रेल्वे स्थानकापर्यंत येतात, आणि त्यांचे पार्किंग कसेही होते. स्काय वॉक सुविधा मिळाल्यास काही प्रमाणात पार्किंग हे मानपाडा रस्त्यावर होईल. तसेच ज्यांना हा अडथळा नको असेल ते थेट स्कायवॉकने रेल्वे स्थानकात जा ये करू शकतील असेही प्रवाशांचे म्हणणे आहे.
वाहतूक पोलिसांनीही या ठिकाणी पार्किंग कसे नियमाने होऊ शकते याबाबतची कार्यवाही आताच करणे गरजेचे आहे. आताच महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ठरवून पार्कींग सुरू केल्यास भविष्यात लॉकडाऊन नंतर उद्धभवणारी फेरीवाले आणि रिक्षा स्टँडची समस्या येणार नाही. त्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असून हीच ती वेळ असेही मत दक्ष नागरिकांनी व्यक्त केले.