ठाणे : ठाण्यासह कल्याण डोंबिवली, मुरबाड, शहाड आदी भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना कल्याण आधारवाडी परिसरातून कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले आहे. त्यांच्याकडून १५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गणेश म्हाडसे (३२) रा. टोकावडे, मुरबाड आणि किशोर साबळे (३१) रा. टोकावडे, मुरबाड अशी आहेत. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३२ वर्षीय फिर्यादी यांनी १ ऑगस्ट रोजी आपली दुचाकी कळवा हॉस्पीटलच्या पार्कींगमधून चोरीला गेल्याची तक्रार केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळवा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमुखांनी यासाठी शोधाशोध सुरु केली.
ज्या ठिकाणाहून ही दुचाकी चोरीला गेली होती, त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर ती दुचाकी पुढे कोणत्या मार्गे कुठे गेली, याचाही तपास याच माध्यमातून करण्यात आला. परंतु यात नेमकी ठोस माहिती पोलिसांकडे नसतांना देखील त्यांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास केला. हा तपास करीत असतांना त्यांनी कल्याण आधारवाडी येथे सापळा रचून किशोर साबळे आणि गणेश म्हाडसे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कुबली दिली. तर आरोपी गणेश म्हाडसे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, डोंबिवली पोलीस ठाण्यातही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली.
त्यानुसार या दोघांकडून ठाण्यातील कळवा हॉस्पीटल, ठाणा मार्केट, तलावपाळी, कोरम मॉल, वागळे इस्टेट, कल्याण कोर्ट परिसर, डोंबिवली पूर्व व पश्चिम, रुक्मीणी हॉस्पीटल कल्याण, शहाड रेल्वे स्टेशन, मुरबाड एसटी स्टॅन्ड, आदी ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली असून त्यांनी १५ गुन्ह्यांची कबुली देत त्यांच्याकडून ३ लाख २९ हजार ८७४ रुपयांच्या १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.