उमेश जाधव
टिटवाळा-: व्यसन मुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत अससणा-या दोन तरूणींनी एका महिलेची ओढणीने गळा आवळून व तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यास टिटवाळा पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायता गाव येथे दिशा सामाजिक सेवा संस्था व्यसन मुक्ती केंद्र आहे. या केंद्रात किशोरी सावंत (३४)या महिलेसह ईशा पांडे (१९), विशाखा कोटावे (१९) या दोन तरूणी उपचारासाठी अॅडमिट होत्या. किशोरीमुळे आपल्याला या केंद्रातून डीचार्ज मिळत नाही असा भ्रम ईशा व विशाखा या दोघींना झाला होता. त्यामुळे त्या कारणावरून त्या दोघी किशोरीकडे रागाने बघायच्या. त्या केंद्रातून आपली सुटका करून घेण्यासाठी त्या दोघींनी किशोरी हिचा कायमचाच काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी किशोरी हिच्या जेवणात उवा मारण्याचे औषध मिसळवले. ते औषध तिने खाल्ल्यावर त्या दोघींनी ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून व तोंडावर उशी दाबून तिला ठार मारले होते. आपले कृत्य उघडकीस येवू नये या करीता त्या दोघींनी किशोरी हिने आत्महत्या केली असल्याची बोंंब ठोकली होती. किशोरी हिचा मृतदेह वैद्यकिय तपासणी व पोस्ट मार्टमसाठी कल्याण येथील राणी रुक्मिणीबाई रुग्णालय येथे नेण्यात आले होते. सर्व प्रथम महात्मा फुले पोलिस ठाण्यात या घाटनेप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. तो एडीआर टिटवाळा पोलिस ठाण्याात वर्ग करण्यात आल्यावर व.पो.नि.पांढरे व पो.उप.नि.प्रदीप आरोटे यांनी त्याचा तपास सुरू केला. या शिवाय वैद्यकिय तपासणी अहवालात किशोरी हिचा मृत्यू गळा आवळून झाला असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यांनी या गुन्हयाचा सखोल तपास करीत किशोरी हिच्यासोबत राहणा-या व तिच्या ओळखीच्या ईशा व विशाखा या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या चौकशीत त्या दोघींनीही किशोरी सावंत या महिलेची हत्या केली असल्याचे तपासात उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी ईशा व विशाखा या दोन तरूणीं विरूध्द टिटवाळा पोलिस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पो.उप.नि.प्रदीप आरोटे करीत आहेत.