ठाणे : ठाण्यातील नामांकित मॉलमधील रेस्टॉरंटमधून देहविक्रीसाठी महिला पुरवणाºया मानवी ऊर्फ पल्लवी गुवारिया (२०) हिच्यासह सुमितसिंग सिंग (४१, रा. कांदिवली) या रिक्षाचालक साथीदारास ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने शुक्रवारी अटक करून दोन बहिणींसह एका महिलेची त्यांच्या जाचातून सुटका केली. आरोपींना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.
मालाड येथे राहणारी मानवी ही तरु णी गरीब व गरजू महिलांना हेरून त्यांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडते, अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांच्या पथकाने शुक्र वारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी येथील लेकसिटी मॉलमधील एका रेस्टॉरंटमध्ये सापळा रचला. यावेळी अटकेतील तरु णी व तिचा रिक्षाचालक साथीदार सुमितसिंग हे दोघेही तीन गरीब महिलांना देहविक्रीसाठी ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, पोलीस पथकाने दलाल तरु णीसह रिक्षाचालक अशा दोघांना अटक केली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. मोसमकर करत आहेत.