नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी:भिवंडी शहरातील अजमेर नगर येथे रविवारी गटारात पडून प्रथमेश यादव या २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .या प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेला.या दुर्दैवी मृत्यूस महानगरपालिका प्रशासन,संबंधित ठेकेदार,अभियंता व स्वच्छता विभाग हे सर्व सामूहिकपणे जबाबदार असून त्यांच्या विरोधात निष्काळजीपणा केल्याने मृत्यूस कारणीभूत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक प्रथमेशचे काका संजय यादव यांनी केली आहे.
या ठिकाणी पालिका प्रशासनाने गटार दुरुस्ती करण्यासाठी दोन वर्षां पासून सुरवात केली आहे. त्यासाठी गटारी वरील स्लॅब फोडून काही इंच उंची वाढवून दुरुस्ती केली, पण त्यावरील स्लॅब अथवा लाद्या टाकून गटार झाकली नसल्याने या ठिकाणी हा अपघात घडला असल्याचा आरोप संजय यादव यांनी केला आहे .तर येथील चेंबर लाद्या लावण्या बाबत स्वच्छता एप वर तक्रार करून ही त्याची दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. या गटारीची नियमित स्वच्छता केली असती तर चिमुकला प्रथमेश जिवंत राहिला असता ,त्यामुळे पालिका प्रशासनाच्या अनास्थेचा हा बळी आहे असे शेवटी संजय यादव यांनी सांगितले.तर नारपोली पोलिसांनी अपघाती मृत्यू ची नोंद असली तरी या अपघात स्थळाचा पंचनामा करून नक्की त्यास कोण जबाबदार आहे हे तपासून त्यानुसार त्यामध्ये दोषी आढळून येणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस प्रशासना तर्फे देण्यात दिली आहे .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"