लोकमत न्यूज नेटवर्क बिर्लागेट : कल्याण-मुरबाड मार्गाशेजारील कांबा-पाचवामैल येथील उल्हास नदीत खडेगोळवली येथील दोन तरुण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह शोधण्यात उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे. तर दुसऱ्या तरुणाचा गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील सात तरुण गुरुवारी कांबा-वाघेरापाडा, पाचवामैल येथील उल्हास नदीत पोहोण्यासाठी उतरले होते. पावसामुळे उल्हास नदीची पातळी वाढल्याने स्थानिकांनी त्यांना पोहायला जाण्यास विरोध केला. मात्र, तरीही ते पाण्यात उतरले. त्यात अक्षय देवकर (१९) व प्रशांत रावते (२२) हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. इतरांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, त्यांना कोणीही वाचवू शकले नाही. म्हारळ पोलीस चौकीतील पोलिसांनी उल्हासनगर अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी शोध घेतला असता रात्री उशिरा प्रशांतचा मृतदेह सापडला. मात्र, अक्षय सापडला नाही. त्यामुळे अखेर रात्री शोधमोहीम थांबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.पाण्यात उतरू नकाउल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्यात कोणीही उतरू नये, असे अवाहन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस प्रदीप कसबे यांनी केले आहे.
उल्हास नदीत दोन तरुण बुडाले
By admin | Published: July 08, 2017 5:23 AM