अंबरनाथ : काटईनाका ते कर्जत आणि कल्याण ते कर्जत हे दोन्ही राज्य महामार्ग धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांत चार तरुणांचा मृत्यू झाल्याने रस्ता आणि तेथील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.बदलापूर येथे राहणारे तरुण दिनेश मुकणे आणि आनंद शिंदे हे बदलापूरहून अंबरनाथला आपल्या दुचाकीवरून येत होते. त्याचवेळी अंबरनाथ दिशेकडे जाणा-या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या नादात या तरुणांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हे दोघे तरुण ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यातील दिनेश मुकणे याचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद शिंदे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातात चूक कोणाची आहे, याचे अद्याप पुरावे पुढे आलेले नाहीत. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताच्या दोन दिवस आधीच एमएमआरडीएच्या आनंदनगर एमआयडीसीसमोरील रस्त्यावर देखील दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातात मृत झालेल्या तरुणांची दुचाकी ही वेगात असली तरी ज्या ठिकाणी हा अपघात घडला ती जागा एमएमआरडीएच्या अधिका-यांमुळे अपघाताचे स्थान ठरले आहे. राज्य महामर्गावर अवघड वळण असू नये हे अपेक्षित असताना एमएमआरडीएने या ठिकाणी मोठे वळण ठेवले आहे. त्या वळणावर गाडी चालकांना पुढचा रस्ता दिसत नसल्याने त्यांची धडक ही थेट रस्त्याच्या दुभाजकाला होते. त्याच अपघातात या दोघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. या आधी देखील याच रस्त्यांवर अनेक दुचाकीस्वारांसोबत चारचाकी गाड्यांचेही अपघात घडले आहे.या ठिकाणी असलेले अवघड वळण काढण्याची गरज असताना देखील त्याचा कोणताच विचार एमएमआरडीए करीत नाही. तर सुरक्षेसाठी या ठिकाणी वेग कमी करण्याची कोणतीच यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. या रस्त्यासोबत फॉरेस्ट नाका ते बदलापूर या रस्त्यावर देखील सुरक्षेचे कोणतेच उपाय करण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रस्ता अरुंद करून ठेवला आहे. एवढेच नव्हे तर रस्त्याचे दुभाजक देखील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आहेत.
दुचाकीच्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू; तीन दिवसांत चौघांचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 6:13 PM