मनोर : मुंबई येथील दोन तरुण मंगळवारी पिकनिकसाठी गांजे-ढेकाळे येथील वांद्री धरणाजवळ आले होते. ते अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता बाहेर आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह मनोर पोलिसांना सापडले. हे दोघेही तरुण मुंबईतील कांदिवली व मालाड येथील आहेत.
अजय साळवे (वय २७) व स्वप्नील म्हस्के (वय २४) हे दोघे मित्र फिरण्यासाठी गांजे-ढेकाळे येथील वांद्री धरणाच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी आले होते. ते अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, नंतर बाहेर आलेच नाहीत. आपली मुले मंगळवारपासून घरी आली नसल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना शोधण्यासाठी बुधवारी निघाले. त्यांचे मोबाइल लोकेशन घेत ते धरणाजवळ पोहोचले. तिथे त्यांना त्यांचे कपडे सापडले. त्यानंतर मनोर पोलिस व ग्रामस्थांनी शोध घेतला असता १२.३० च्या दरम्यान दोघांचे मृतदेह पाण्यात सापडले.
अजय साळवे हा तरुण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मामाचा मुलगा आहे. त्यांना बातमी कळताच ते स्वतः घटनास्थळी आले होते. त्यांनी मनोर पोलिस ठाण्यात भेट देऊन त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. मनोर पोलिस ठाण्यात अकस्मात गुन्हाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक कोते करीत आहेत.