लोकमत न्यूज नेटवर्क मीरा राेड : मीरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात पेणकरपाड्यातील खोडियार चाळीपासून दहिसरच्या एन.एल. संकुलास जोडणारा रस्ता नसतानाही पालिकेने खाडीपात्रात चक्क पाइप टाकून रस्ता बांधण्याचा प्रकार उघड झाला आहे.दहिसर व मीरा रोड दरम्यान असलेल्या जाफरी खाडीचे पात्र व परिसर विस्तीर्ण असून कांदळवन आहे. पेणकरपाड्यातील सरकारी जागेत तसेच पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षणात झालेल्या खोडियार चाळींच्या जवळ ते खाडीपात्र ओलांडून पलीकडे मुंबईच्या हद्दीतील दहिसरच्या एन.एल. कॉम्प्लेक्सला जोडणारा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव पालिकेने केला. त्यासाठी चक्क खाडीच्या प्रवाहात पाइप टाकून त्यावर भराव करून रस्ता बांधण्याचे १९ लाखांचे कंत्राट पालिकेने गजानन कन्स्ट्रक्शनला दिले आहे. महापौर ज्योत्स्ना हसनाळे व भाजप नगरसेवकांनी त्याचे भूमिपूजनही केले होते.या कंत्राटदारानेही खाडी पात्रात पाइप टाकून त्यावर भराव केला आहे. परंतु रस्ता बांधून अजून तो मुंबईला जोडण्याचे काम थांबले आहे. वास्तविक मीरा-भाईंदर शहराच्या मंजूर विकास आराखड्यात असा रस्ताच नाही आहे. हा रस्ता झाल्यास पेणकरपाडा गावातून वाहनांची वर्दळ वाढून कोंडी होणार आहे. पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगर, जंगलातून येणारे पाणी तसेच परिसरातील दहिसर व मीरा-भाईंदरच्या हद्दीतील पाणी याच खाडीपात्रातून पुढे जाते. याबाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित, कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हा रस्ता विकास आराखड्यात नाही. रस्ता बांधल्यास पेणकरपाडा गावात प्रचंड वाहतूककोंडी होईल. शिवाय खाडीपात्रात पाइप टाकून भराव केल्यास पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळे या रस्त्यास आपण विरोध केला असून प्रभाग समितीच्या बैठकीत हे काम बंद केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. - सोमनाथ पवार, प्रभाग समिती सदस्य