-----------------
ज्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते, त्या ठिकाणी रस्त्याच्या पुढच्या भागावर पळून जाणाऱ्या वाहनचालकांना अडविण्यासाठी पोलीस तैनात करण्यात येतात. मात्र नाकाबंदी पाहून मागच्या मागे निघून जाणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही.
नाकाबंदी दरम्यान मास्कवर कारवाई होत आहे याची कल्पना आल्यावर नाकाबंदीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर उभे राहून काही वाहनचालक तोंडावर मास्क लावतात आणि पुढे निघून जातात, अशा बेजबाबदार नागरिकांवर देखील कोणतीही कारवाई होत नाही.
सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्यासाठी देखील अशा प्रकारची नाकाबंदी महत्त्वाची ठरते. मात्र या नाका-बंदी दरम्यान चोरटे लांबूनच नाकाबंदी पाहून मागच्या मागेच पसार होत आहेत. त्यामुळे नाकाबंदी करताना पळून जाणाऱ्या चोरट्यांवर आणि बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
नाकाबंदीत कागदपत्रांची तपासणी करण्याच्या बहाण्याने अनेक कर्मचारी वाहनचालकांना बाजूला घेऊन त्यांच्याकडून तडजोडीसाठी अर्थपूर्ण व्यवहार करीत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त होत आहेत. त्यामुळे नाकाबंदी ही शिस्त लावण्यासाठी आहे की वसुलीसाठी आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
--------------