दोघे ताब्यात, अन्य चौघांचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाची हत्या करून त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी कसारा घाटात फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना १ ते ९ ऑगस्ट या कालावधीत घडली असून, या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी दोघा आरोपींना उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. उर्वरित चौघा आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेंद्रकुमार गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या उत्तर प्रदेशातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कार चोरी करण्याचा बेत सहा आरोपींपैकी अमन गौतमने आखला होता. त्यानुसार उबेर कंपनीकडे कल्याण ते धुळे असा प्रवास करण्याकरिता १ ऑगस्टला कार बुक केली. उबेर कंपनीकडून देण्यात आलेल्या कारचा चालक अमृत गावडे (रा. नवी मुंंबई) हा कार घेऊन कल्याणच्या शिवाजी चौकात रात्री साडेअकराच्या सुमारास आला. अमन वगळता उर्वरित पाच जण या कारमध्ये बसले. कारने आग्रा रोडने प्रवास करत असताना त्यांनी कार चालकाचे अपहरण केले. पडघा ते कसारा दरम्यान त्यांच्याकडील चाकूने चालक अमृत याच्यावर वार करून त्याला ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. त्यानंतर कारसह मारेकरी पसार झाले. अमृत बेपत्ता झाल्याची तक्रार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी कार बुक करणाऱ्या आरोपीचा मोबाइल ट्रॅक करीत ते आरोपी राहुलकुमार आणि धर्मेंद्रकुमार या उत्तर प्रदेशातील दोघांपर्यंत पोहोचले. तेथून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक त्यांना घेऊन कल्याणकडे रवाना झाले आहे. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने कारचालक अमृत याची हत्या केल्याची कबुली दिली. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी अन्य एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
.........
वाचली.