वाडा : वाडा तालुक्यात विभागवार लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून वाडा शहर, कुडूस, कंचाड, परळी अशी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मात्र सोमवारी कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र अचानक बंद करून उचाट या एकट्या गावासाठी लसीकरण करण्यात आले. पहाटेपासून कुडूस केंद्रावर रांगेत राहिलेल्या वयोवृद्धांना हे केंद्र आज बंद असल्याचे समजल्याने त्यांनी चांगलाच संताप व्यक्त करून एकट्या उचाट गावावर प्रशासन मेहेरबान का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. संपूर्ण राज्यात एका गावासाठी लसीकरण केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यात १८ ते ४४ व त्यापुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी विभागवार लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ४४ वयोगटातील व्यक्तीसाठी वाडा ग्रामीण रुग्णालय, कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्र, खानिवली प्राथमिक आरोग्य केंद्र ,गोऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र व परळी प्राथमिक आरोग्य केंद्र अशी केंद्र तर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीसाठी वाडा शहरातील पी.जे. हायस्कूल, कुडूस येथील जिल्हा परिषद शाळा व कंचाड अशी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. असे असतानाच कुडूस येथील दोन्ही केंद्रे सोमवारी बंद ठेवून एकट्या उचाट गावासाठी लसीकरण करण्यात आले. यावेळी ऑनलाईन नोंदणी वगैरे सर्व प्रशासनाने नियम पायदळी तुडवले असल्याचा आरोप नागरिकांना केला आहे. या गावातील १३० नागरिकांची यादी तयार करून त्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.