लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात रोशनी यांना ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे रोशनी शिंदे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
घोडबंदर येथे रोशनी शिंदे यांना काही महिलांनी मारहाण केली होती. ही मारहाण शिंदे गटाने केल्याचा आरोप रोशनी यांनी केला आहे, तर रोशनी शिंदे यांनी समाजमाध्यमावर शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी रोशनी शिंदे यांनी वकिलांच्या माध्यमातून ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.