ठाणे : मुख्यमंत्री शिंदे विचारतात उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतके विसरभोळे असतील असं वाटलं नव्हतं. २०१९ साली स्वतः निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा किसननगरमध्ये घेणारे एकनाथ शिंदे हे त्यांचं कर्तृत्व विचारतात, हा मोठा विनोद आहे असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील पत्रकार परिषदेवर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. २०१९ साली एकनाथ शिंदे यांनी निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरेंची किसन नगरमध्ये विशेष सभा घेतली होती.
स्वतःला निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा घेता आणि उद्धव साहेबांचे कर्तुत्व विचारता? असा टोलाच संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. २०१४ साली भाजपसोबत नसतानाही ६३ आमदार उद्धव ठाकरेंनी निवडून आणले हे उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेना पक्षात भाजप करत असलेल्या अंतर्गत विरोधानंतर सक्षमपणे चालवून निवडणूक जिंकणे हे उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व आहे. तुम्ही गद्दारी केली नसती तर शिवसेना क्रमांक एकचा पक्ष झाला असता, असेही संजय घाडीगावकर यांनी शिंदेंना सुनावले आहे.