ठाणे - युती जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरु झाले आहे. त्यानुसार ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण भागातील संभावीत बंडाळी थोपविण्यासाठी श्रेष्ठींनी अखेरच्या क्षणी प्रताप सरनाईक आणि सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे वरीष्ठांनी जरी हा तिडा सोडवला असला तरी स्थानिक पातळीवर अजूनही शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे नाराज आदेश पाळणार की बंड करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सरनाईकांच्या विरोधात असलेल्या काहींनी मुलाखती देऊन आव्हान निर्माण केले होते. त्यामध्ये महापौर मीनाक्षी शिंदे, नरेश मणोरा आदींचा समावेश होता. शिवाय सरनाईक यांना उमेदवारी मिळू नये यासाठीदेखील मोठे लॉबींग सुरु होते. परंतु पक्षाने सलग तिसऱ्यांदा सरनाईक यांच्यावर विश्वास टाकला असून युती होण्यापूर्वीच एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे सरनाईकांच्या विरोधात असलेल्या त्यांच्याच पक्षातील मंडळींना वरीष्ठांनी हादरा दिला आहे. दरम्यान सरनाईक आता 1 ऑक्टोबरला आपला अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दुसरीकडे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्याविरोधातही काहींनी बंड थोपटले होते. त्यानुसार उमेदवारी आपल्यालाच मिळावी या दृष्टीने रमेश म्हात्रे, राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, ठाणो महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी आदींनी मुलाखती देऊन भोईरांपुढे कडवे आव्हान उभे केले होते. परंतु वरीष्ठांनी या नाराजांचे कडवे आव्हान ऐन उमेदवारी अर्ज भरण्याची आधीच थंड केले असून सुभाष भोईर यांच्यावरही सलग दुस:यांदा विश्वास टाकला असून पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. त्यानुसार येत्या 3 ऑक्टोबर रोजी भोईर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शिवसेनेच्या वरीष्ठांकडून पक्षातील संभावीत बंडाळी टाळण्यासाठीच हा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. परंतु स्थानिक पातळीवर नाराज झालेले हे बंडोबा आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असून बंड थोपटणार की पक्षाचा आदेश पाळला जाणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.