ठाणे - शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले अन् ठाण्याचे माजीमंत्री राज्याचे मुख्यमंत्री बनले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर, ठाण्यात मोठा जल्लोषही पाहायला मिळाला. पण, शिवसेनेतील काहींना एकनाथ शिंदेना विरोध करत ठाकरेंच्या मूळ शिवसेनेसोबतच ठाम राहण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज प्रथमच ठाण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन प्रजासत्ताकदिनी त्यांनी बंडखोरांचा समाचार घेतला. यावेळी, उपस्थितांना भावनिक आवाहनही केलं.
स्व. आनंद दिघे यांच्या शुक्रवारी असलेल्या जयंतीपूर्वी उद्धव ठाकरेंनी ठाण्यात हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उद्या ठाण्यात असून तेही दिघे यांच्या समाधीस्थळी जातील अशी शक्यता आहे. यावेळी, उद्धव ठाकरेंनी जैन धर्मीयांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, यावेळी बोलताना ठाणेकरांना एक आवाहनही केले. प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको तुमचे मत द्या, असा मतांचा जोगवा उद्धव ठाकरे यांनी जैन धर्मियांसमोर मागितला. यावेळी, जैन धर्मीय सदैव तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन जैन धर्मगुरूंनी ठाकरेंना दिले.
उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जैन धर्मियांच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. तुम्ही रक्त मागितले तरी ते द्यायला तयार असल्याचे कार्यक्रमातील एका आयोजकाने भाषणात जाहीर केले. त्यावेळेस उद्धव यांनी त्यांच्या भाषणात प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको मत द्या.. असे म्हणत भाषणावर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, यावेळेस जैन धर्मगुरूंचे आशिर्वाद उद्धव यांनी घेतले. त्यावेळेस धर्मगुरूंनी त्यांना सैदव तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले.
आनंद दिघेंचं दर्शन, शिंदेंवर निशाणा
उद्धव हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. सकाळी १० वाजता हे शिबिर सुरू झाले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त ठाणे येथे आयोजित विविध कार्यक्रमांना उद्धव ठाकरेंची उपस्थित लक्षवेधी ठरली. यावेळी टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. उद्धव ठाकरेंनी येथील सभेत बोलताना नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे होते, ते विकले गेले, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, ही महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी आहे, असेही ते म्हणाले.