रणजीत इंगळे, Thane Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी आणि त्यांचे चालक अनिल मोरे यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडून एम. के. मढवी यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. याआधी देखील असे धमकवण्याचे प्रकार झाले आहेत का? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येणार असल्याने मढवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २९ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार असून राजन विचारेंसोबत निष्ठावंत असणारे एम. के. मढवी हे मात्र तुरुंगात असणार आहेत.
ठाणे लोकसभेत कसं आहे राजकीय चित्र?
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी अद्याप महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजन विचारे यांनी नुकताच उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज घेण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे असून २७ एप्रिल, २८ एप्रिल आणि १ मे रोजी सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राजन विचारे यांसह ४ उमेदवारी अर्ज घेण्यात आले असून भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज घेण्यात आला नाही. उमेदवारी अर्ज घेतलेल्या नेत्यांमध्ये भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसान पार्टी २ आदी राजकीय पक्षांचा समावेश आहे.