ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ग्रामीण भागात गेले की, युती गेली खड्ड्यात, असे उच्चरवात बोलतात आणि मुंबईत आल्यावर गुपचूप मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकीतील युतीची चर्चा करतात. त्यामुळे भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. त्याचवेळी शिवसेना म्हणजे सत्तेच्या गुळाच्या ढेपेला चिकटून बसलेला मुंगळा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित निर्धार परिवर्तन या मेळाव्यात पवार व पाटील बोलत होते. गडकरी रंगायतन येथे आयोजित या मेळाव्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक, महिला आघाडीच्या चित्रा वाघ, आ. जितेंद्र आव्हाड, माजी खा. आनंद परांजपे व संजीव नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, कुठलाही घटक शिवसेना-भाजपाच्या कामाविषयी समाधानी नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप गेली पाच दिवस सुरू आहे. त्यात लक्ष घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांना वेळ नाही. वर्षानुवर्षे या दोन्ही पक्षांची सत्ता असलेल्या बेस्टचा कर्मचारी समाधानी नाही, तो लोकांना काय सेवा देणार? ठाणे, कल्याण-डोेंबिवली महापालिकांसह ‘बेस्ट’मध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. या तिन्ही महापालिकांत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. परिवहनखात्याचे मंत्री दिवाकर रावते आहेत. ते ‘शिवशाही’च्या नावाने एसटी बस चालवत आहेत. त्या शिवशाहीला दिवसाढवळ्या आग लागते. सर्वच स्तरांवर हे दोन्ही पक्ष नाकाम ठरले आहेत.
निवडणुका आल्या की, शिवसेना-भाजपाला राम मंदिर आठवते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्मारक जी शिवसेना बांधू शकली नाही, ती राम मंदिर काय बांधणार? बुलेट ट्रेनसाठी सव्वा लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. कशाला हवी बुलेट ट्रेन? सरदार पटेल यांचा पुतळा उभारून काय साध्य होणार? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.भाजपावाल्यांनी हनुमानाला दलित केले
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या भाजपावाल्यांनी हनुमानाला दलित केले. दलित हनुमानाने ओपन कॅटेगरीतील रामाकरिता ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली, असेही भाजपाची मंडळी सांगत फिरतील. देवांनासुद्धा जातीच्या तागडीत तोलण्याच्या यांच्या अट्टहासापायी देवांसाठीही यापुढे मोदी सरकारने आरक्षण लागू केले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. देशातील सर्व इन्स्टिट्यूशन मोडीत काढण्याचे कारस्थान सरकारने सुरू ठेवले आहे. मोदी सांगतात, मी चहा विकत होतो. आता देश विकू नका.