डोंबिवली : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मराठी मतांबरोबरच डोंबिवली-ठाकुर्ली परिसरातील दाक्षिणात्य मते मिळवण्याकरिता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे आयोजित भव्य बालाजी लग्नसोहळ्यास शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी उपस्थित राहिले व त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. अयोध्येत जाऊन ठाकरे यांनी अलीकडेच राम मंदिराचा गजर करून मुंबई, ठाण्यातील उत्तर भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.डोंबिवलीच्या क्रीडासंकुलात भव्य बालाजी लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. डोंबिवली व आसपासच्या ठाकुर्ली शहरात दाक्षिणात्य मतदारांची संख्या जास्त आहे. त्यात तामिळ व केरळी समाजांची लोकवस्ती आहे. शिवसेनेने स्थापनेच्यावेळी मराठी माणसांच्या नोकऱ्या हिरावून घेतलेल्या दाक्षिणात्यांविरोधात भूमिका घेतली होती. मात्र, गेली कित्येक वर्षे शिवसेनेचा दाक्षिणात्यविरोध मावळला आहे. त्यानंतर, सेनेचा उत्तर भारतीय विरोध तीव्र होता. परंतु, २००० सालात शिवसेनेने ‘मी मुंबईकर’ अभियान सुुरू करून जे १५ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत वास्तव्य करत आहेत, त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी सेनेत असलेल्या राज ठाकरे यांनी रेल्वे परीक्षेला आलेल्या बिहारी तरुणांना झोडपून उद्धव यांच्या अभियानाला सुरुंग लावला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व जातीधर्मांच्या लोकांना बांधण्यासाठी विविध मोठमोठे कार्यक्रम शिवसेनेकडून हाती घेतले जातात. गुजराती समाजासाठी दरवर्षी डोंबिवलीत भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने शिव मंदिर उत्सव आयोजित केला जातो. डोंबिवलीतील केरळी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन आगरी महोत्सवात गतवर्षी घडवण्यात आले होते. मात्र, शिवसेनेकडून दाक्षिणात्यांसाठी कोणताच कार्यक्रम हाती घेतला जात नसल्याची बाब शिवसेनेच्याध्यानात आल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने बालाजी लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हेही हजर होते. बालाजी यांचे दर्शन घेतले. यावेळी पुरोहितांनी ठाकरे पितापुत्राचा यथोचित सत्कार केला. डोंबिवलीत केरळी, तामिळ समाजांची वस्ती जास्त असून त्यांच्या विविध शिक्षण संस्था कार्यरत आहे. तसेच समाजसंस्थाही कार्यरत आहेत. दाक्षिणात्य मोठ्या संख्येने मते देतात व बºयाचदा त्यांचेमतदान एकगठ्ठा असते. निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपात शिवसेनेला आशीर्वाद मिळावेत, यासाठीच बालाजी लग्नसोहळ्याचा घाट घातला गेला. शिवसेनेच्या या कार्यक्रमास दाक्षिणात्यांनी अलोट गर्दी केली होती.>भोईर यांची दुष्काळग्रस्तांना मदतकल्याण ग्रामीणमधील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडेसुपूर्द केला.
दाक्षिणात्यांच्या मतांसाठी उद्धव ठाकरे बालाजी चरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 1:14 AM