बदलापूर : एका अंध मातेचा मुलगा रेल्वे रुळावर पडल्यानंतर रेल्वेचा पॉइंट्समन मयूर शेळके यांनी त्याला वाचविल्याची घटना १७ एप्रिल रोजी वांगणी रेल्वेस्थानकात घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. याच घटनेचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून यामध्ये उद्यान एक्स्प्रेसच्या चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवल्याचे पाहायला मिळत आहे.
१७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणारी उद्यान एक्स्प्रेस वांगणी रेल्वेस्थानकात येत असताना मयूर हा फलाटाच्या विरुद्ध दिशेला रेल्वे रुळात एक्स्प्रेसच्या चालकाला झेंडा दाखवण्यासाठी उभा होता. याच वेळी अंध माता संगीता शिरसाट या मुलगा साहील याला घेऊन फलाटावरून जात होत्या. मात्र, त्यांचा अंदाज चुकल्याने त्या फलाटाच्या कडेला गेल्या आणि त्यांचा मुलगा साहील हा रेल्वे रुळावर पडला.
हा प्रकार पाहून मयूर शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता साहीलच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवले. यानंतर अवघ्या काही क्षणात भरधाव वेगातील उद्यान एक्स्प्रेस बाजूने धडधडत निघून गेली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आल्यानंतर मयूर शेळके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. आता याच घटनेचे दुसऱ्या अँगलचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये मयूर यांनी कशा पद्धतीने या अंध मातेच्या मुलाला वाचवलं, हे स्पष्टपणे दिसत आहे.