उकडीचा प्रतिनग मोदक @२५ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:33 AM2018-09-09T03:33:01+5:302018-09-09T03:33:16+5:30
बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकाला यंदा महागाईची झळ बसली आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकाला यंदा महागाईची झळ बसली आहे. कच्चा माल महागल्यामुळे प्रतिमोदकाचा दर थेट २५ रुपयांवर येऊन पोहोचला आहे. मोदकाच्या वाढलेल्या दरामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. खिशाला परवडेल इतकेच मोदक गणेशभक्तांकडून यावेळेस खरेदी होतील, असे निरीक्षण उपाहारगृहांच्या मालकांनी नोंदवले.
गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. सर्वत्र खरेदीचा उत्साह आहे. भक्तांनी आपल्या तयारीचा जोर वाढवला आहे. यात महत्त्वाची तयारी असते, ती बाप्पाच्या नैवेद्याची. उकडीचा मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य असल्याने घरोघरी हा नैवेद्य दाखवला जातो. परंतु, नोकरीमुळे आणि वेळेअभावी महिलावर्गाला घरी ते बनवणे शक्य नसते. तसेच, ते प्रत्येकालाच बनवता येतात असे नाही. यातूनच रेडिमेड उकडीचे मोदक ही संकल्पना अस्तित्वात आली आणि ती काळानुसार चांगलीच रुजली. उपाहारगृहांमध्ये उकडीच्या मोदकांची आवर्जून विक्री केली जाते. काही महिला घरीच आॅर्डर्स घेतात. अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गेल्या आठवडाभरापासून उकडीच्या मोदकांचे बुकिंग सुरू झाले आहे. या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपाहारगृहाच्या मालकांनी सांगितले. २२ रुपयांना मिळणारा मोदक यंदा २५ रुपये प्रतिनग मिळणार आहे. मोदकांचा दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. जिथे ११ मोदक खरेदी केले जात होते, तिथे सात किंवा पाच मोदकांची खरेदी होईल. त्यामुळे उकडीच्या मोदकांची खरेदी होईल पण खिसा चाचपूनच, असा सूर बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. उकडीच्या मोदकांना जीएसटीची झळ बसणार नाही, असे उपाहारगृहाचे मालक संजय पुराणिक यांनी सांगितले.
>पहिल्या दिवशीच या मोदकांची खरेदी होणार असल्याने पहाटेपासून मोदक बनवण्यास सुरुवात होईल. आतापर्यंत ३५५५ मोदकांचे बुकिंग झाले असून पाच हजार मोदक बनवले जाणार आहे.
- संजय पुराणिक