उल्हासनगर - उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध व जुन्या सिंध महाराष्ट्रीयन निवडणुकीत उल्हास पॅनल विजयी झाले आहे. तर विद्यमान शिवसेना नगरसेवकांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून विद्या प्रबोधिनी पॅनलचे व शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव यांच्यासह दोघांचा निसटता विजय झाला आहे.
देशाच्या फाळणीवेळी सिंध प्रांतातून निर्वासित झालेल्या मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती, परिठ समाजाने, मुलांच्या शिक्षणासाठी सिंध महाराष्ट्रीयन संस्थेची स्थापना करून उल्हास विद्यालय सुरू केले. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष मनसुलकर यांचे उल्हास विकास पॅनल, शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक चंद्रशेखर यादव, सुरेंद्र सावंत यांचे विद्या प्रबोधन पॅनल व माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांचे उत्कर्ष पॅनल आमने-सामने उभे ठाकले. अध्यक्ष पदासाठी मालवणकर, सावंत व मनसुलकर यांच्या लढतीकडे सर्व शहराचे लक्ष लागले होते. अखेर अटीतटीच्या झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मनसुलकर यांनी अवघ्या 3 मतांनी सुरेंद्र सावंत यांचा पराभव केला. मनसुलकरांच्या उल्हास पॅनलचे 15 पैकी 13 सदस्य निवडून येऊन विद्यमान शिवसेना नगरसेवकांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला.
उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मराठा सेक्शन भागात 1948 मध्ये सिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची स्थापना केली. 1955 मध्ये संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली. उल्हास विद्यालय ही शाळा बांधली. उल्हासनगरात पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात देखील याच संस्थेने केली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशान्वये झाली आहे. उल्हास विकास पॅनलचे सुभाष मनसुलकर, अध्यक्ष सुरेश परब, उपाध्यक्ष अजय गावडे सरचिटणीस मुकेश पाताडे, चिटणीस राजेश गावडे, खजिनदार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकारीणी सदस्यपदी राजेश मयेकर, सुनिल गावडे, दत्तात्रय राऊळ, संतोष इंदूरकर, दिनेश लद्देलू, विवेक दळवी, गणेश भाटकर, दिलीप सावंत हे आठ जण निवडून आले. तर विद्या प्रबोधन पॅनलचे शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव व उपशाखाप्रमुख राकेश कांबळी यांचा सदस्यपदी विजय झाला. मनसुलकर यांच्या उल्हास विकास पॅनलने सिंध महाराष्ट्रीय समाज निवडणुकीत बाजी मारल्याने, राजकारणात कमबॅक करण्याचे संकेत मिळू लागले आहे.