बदलापूर : वांगणी स्टेशनवरून पुढे वांगणी गावातून काराव व पुढील अन्य गावांकडे जाताना वाटेत उल्हास नदीवर असलेला पूल १९९८-९९ दरम्यान अंबरनाथचे तत्कालीन आमदार व मंत्री साबीर शेख यांच्या पुढाकाराने बांधण्यात आला होता. हा पूल आता मोडकळीस आला आहे. राज्य सरकारच्या बांधकाम खात्यानेच तो धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढून तसे फलक काही महिन्यांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूंनी लावलेले आहेत.
हा पूल अरुंद असून एकाचवेळी समोरासमोरून येणाऱ्या चारचाकी व अन्य वाहनांच्या चालकांना वाहने खूपच खबरदारीने चालवावी लागतात. सरकारने पूल धोकादायक असल्याचे जाहीर करूनही व त्यावरून अवजड वाहनांना जाण्यास मनाई करणारे फलक सात ते आठ महिन्यांपूर्वी लावले. पण, आजही या धोकादायक पुलावरून अगदी सहाचाकी ट्रक्स, कॉलेजला विद्यार्थ्यांची नेआण करणाºया बस, इतर चारचाकी खासगी वाहने, रिक्षा, दुचाकी वाहने सर्रास नेली जातात. वांगणीहून काराव व आजूबाजूच्या व पुढील गावांना जाण्यासाठी जवळचा व सोयीस्कर अन्य रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे लोक जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत.
सरकारनेच धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या या पुलावर केव्हाही दुर्घटना घडू शकते, याकडे संबंधित खाते, प्रशासन, ग्रामस्थ, प्रवास करणारे अन्य सर्वच डोळेझाक करत आहेत. या पुलावरून अहोरात्र सर्रास अवजड व अन्य वाहने चालवली जातात. प्रशासनाने तातडीने ही वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे.
पर्यायी पूल बांधण्याची मागणीउल्हास नदीवरील या पुलाला पर्यायी मोठा व रुंद पूल बांधण्यात यावा, तोपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, वांगणी- काराव रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी वांगणी, काराव व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वांगणी-काराव रस्त्याची दुरवस्थावांगणी स्टेशन, गाव येथून काराव गावाला जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा व सर्व चारचाकी वाहने जातात व मोठी वाहतूक दिवसरात्र होत असते. हा रस्ता मोठ्या चढउतारांचा, खड्डे व खाचखळग्यांनी भरलेला आहे. या रस्त्याचे रूंदीकरण, काँक्रिटीकरण होण्याची आवश्यकता आहे.