कल्याण : उल्हास नदीच्या प्रदूषणास जबाबदार असलेल्या यंत्रणांच्या निषेधार्थ उल्हास नदी बचाव कृती समितीने रविवारी नदीकिनारी होळी पेटवली.
उल्हास नदी पात्रात प्रदूषित पाणी सोडले जाते. त्याचबरोबर नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगवली आहे. या प्रकारास प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, लघू पाटबंधारे विभाग, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. नदी स्वच्छतेबाबत सरकार उदासीन आहे. उल्हास नदीस मिळणारी वालधुनी नदी सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. वालधुनी नदीचा नाला झाला आहे. तिच्या पुनर्विकासाबाबतही सरकार उदासीन आहे.
वालधुनी नदीप्रमाणेच उल्हास नदीही प्रदूषित होण्याच्या वाटेवर आहे. प्रदूषण रोखण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसह उल्हास नदी बचाव कृती समिती उपक्रम राबवित आहे. श्रमदान करून जनजागृती करीत आहे. अनेक निषेधात्मक आंदोलन करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे उल्हास नदी बचाव कृती समितीने होळीनिमित्त नदीकिनारी निषेध होळी पेटवून प्रदूषण करणारे व रोखण्यास अपयशी ठरलेल्या यंत्रणांचा निषेध व्यक्त केला.
कृती समितीचे रवींद्र लिंगायत, अश्वीन भोईर, अनिकेत व्यवहारे, निकेश पावशे, प्रशांत शेंडगे, भूषण लोखंडे, सागर लोखंडे, अनिरुद्ध भालेराव, निखिल अंबावणे, हृषीकेश गायकवाड, सचिन शिंगे, महादेव बंदीचोडे आदी ग्रामस्थ सहभागी होते.
--------------------