लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेच्या विविध कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचे ६० तर इतर १५० पेक्षा जास्त बेड शिल्लक असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. कॅम्प नं.-४ येथील शासकीय कोविड रुग्णालय सुरू केले असून महापालिका शाळा क्र. १४ मध्ये २०० बेडचे आरोग्य सुविधा केंद्र सुरू केल्याची माहिती देऊन, शहरवासीयांना दिलासा दिला.
उल्हासनगर महापालिकेने कोविड रुग्णासाठी विविध आरोग्य सुविधेसह आरोग्य केंद्र सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णाची संख्या घटून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या साई प्लॅटिनियम कोविड रुग्णालयात, रेडक्रॉस रुग्णालयात व कॅम्प नं.-४ येथील शासकीय कोविड रुग्णालयामध्ये ६० पेक्षा जास्त ऑक्सिजन बेडसह इतर १५० बेड शिल्लक आहेत. महापालिका शाळा क्र.१४ मध्ये आरोग्य केंद्र सुरू केले असून तेथे २०० बेडची व्यवस्था केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच डॉक्टरसह नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व वॉर्डबॉयची भरती केल्याची माहिती दिली.
महापालिका कोविड रुग्णालयासह खासगी रुग्णालयाला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर महापालिका आरोग्य विभागाचे लक्ष असून शहरात अद्याप ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला नसल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले. आयुक्त डॉ. राजा दयानिधी सोमवारी महापालिका सेवेत रुजू होणार होते. मात्र रुजू न झाल्याने, पुन्हा त्यांच्या बदलीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली. आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, ते सुट्टीवर आहेत.
........
महापालिका आरोग्य विभागाचे कौतुक
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे, उपायुक्त मदन सोंडे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ राजा रिजवानी, डॉ अनिता सपकाळे, यांच्यासह आरोग्य विभागाच्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्या कामाचे कौतुक केले. महापौर लीलाबाई आशान यांनी आरोग्य विभागाच्या कामाचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली.
.........
वाचली