उल्हासनगर : महापौर, उपमहापौर यापाठोपाठ स्थायी समिती सभापतीपदी पराभव झाल्याने भाजप कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना विश्वासात घेण्यासाठी शुक्रवारी कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत पक्षविरोधी कारवाई केलेले शहर महासचिव रवी पाटील यांची हकालपट्टी करून ओमप्रकाश वर्मा यांची त्यापदी शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी निवड केली.उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही झालेला पराभव जिव्हारी लागल्याने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. बैठकीला आमदार कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, मनोहर खेमचंदानी, प्रकाश माखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी, लाल पंजाबी, राजू जग्यासी, मंगला चांडा, अर्चना करणकाळे आदी उपस्थित होते. पक्षातील बंडखोर नगरसेवक व पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या पदाधिकारींबाबत चर्चा झाली. शहर महासचिव पाटील यांच्यावर कारवाई केली. तसेच बंडखोर नगरसेवकांबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पुरस्वानी म्हणाले.महापौर, उपमहापौर निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांवर अद्याप कारवाई झाली नसल्यानेच पक्षाला बंडखोरीची लागण लागल्याची प्रतिक्रिया पदाधिकारी, कार्यकर्ते देत आहेत. स्थायी, प्रभाग समिती सभापती निवडणुकीपूर्वी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत ओमी कलानी यांची बैठक झाल्यावर ओमी टीम समर्थक नगरसेवक पुन्हा भाजपकडे आले. मात्र, त्याचा फायदा पक्षाला झाला नाही. उलट महापौर, उपमहापौर यापाठोपाठ स्थायी समिती सभापतीपद बहुमत असताना हातातून गेले.
पदाधिकारी यांचे राजीनामासत्रभाजपच्या शहराध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाल्यावर पक्ष मजबूत होण्याऐवजी बंडखोरी वाढल्याची टीका युवानेते संजय सिंग यांनी केली. झालेल्या पराभवानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.