सदानंद नाईक -
उल्हासनगरमधील एका अंगणवाडी शिक्षिकेचा मुलगा असलेल्या रोशन देशमुखने यूपीएससी परीक्षेत ४५१ वा रँक मिळवला आहे. रोशनचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला रोशन महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत अभ्यास करायचा. त्याच्या यशाने भारावलेल्या शहरवासीयांनी बुधवारी अभ्यासिकेत त्याचा जाहीर सत्कार केला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकरही उपस्थित होते.
उल्हासनगर कॅम्प नं-४ कृष्णानगरमध्ये चाळीच्या घरात राहणाऱ्या रोशन देशमुखचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अमरावती शहरात तर इयत्ता पाचवी ते १० पर्यंतचे शिक्षण शहरातील उल्हास विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. ११ व १२ वीचे शिक्षण सीएचएम महाविद्यालयातून केले. त्यानंतर नवीमुंबई खारघर येथील ए सी पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मधून बीई केले. सन -२०१७ पासून स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरवातीचे एक वर्ष पुणे येथे यूपीएससीचा अभ्यास खाजगी वर्गातून केल्यानंतर, दोन वर्षे महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत येऊन अभ्यास सुरू केला. कोरोना काळात सावधगिरीचा उपाय म्हणून अभ्यासिका बंद ठेवल्याने घरीच अभ्यास सुरू केला. या दरम्यान तीन वेळा यूपीएससी परीक्षेत अपयश आले. मात्र रोशन याने हार पत्करली नाही.
रोशनने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ४५१ वा रँक मिळवला. दरम्यान मुलाखतीसाठी ठाणे येथील एक खाजगी वर्गात प्रशिक्षण घेतले. तसेच दिल्लीतील एका खाजगी क्लासमधून ऑनलाइन माहिती घेतली. ४ महिन्यांपूर्वी एअरफोर्स मुंबई येथे कामाला लागलेला रोशन सोमवारी एमपीएससी परीक्षेत पास झाला. कामावर असतांना सोमवारी दुपारी मित्राचा फोन आल्यावर, यूपीएससी परीक्षेत पास झाल्याची गोड बातमी त्याला समजली. त्यानंतर त्याने आई व वडिलांना याबाबत माहिती दिली. आई वडिलांचा एकुलता एक असलेल्या रोशन देशमुख याने स्वतःच्या जिद्दीवर यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. घर चाळीत असल्याने, दोन वर्षे रोज डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत जाऊन तर कोरोना काळात घरीच एका बेडवर बसून अभ्यास केला. अखेर परिश्रमाला व जिद्दीला यश आल्याची प्रतिक्रिया रोशनच्या आईने दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासित जाहीर सत्कार डॉ आंबेडकर अभ्याशिकेच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, माजी आमदार पप्पु कलानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आदींनी रोशन देशमुखचा जाहीर सत्कार केला.