उल्हासनगर : शहरातील चौक, स्टेशन परिसर, मैदान, मार्केट आदी ठिकाणी अवैधपणे लावण्यात आलेल्या पोस्टर्स, बॅनर्स व पक्ष झेंड्यावर महापालिका अतिक्रमण पथकाने कारवाई केली. या कारवाईने शहर बॅनर्स व पोस्टर्स मुक्त झाले असून ५०० पेक्षा जास्त पोस्टर्स व बॅनर्स जप्त करण्यात आल्याची माहिती पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिले आहे.
उल्हासनगर महापालिका मुख्यालय परिसर, मुख्य रस्त्याच्या डिव्हायडर, उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन, गोलमैदान, मुख्य चौकात राजकीय पक्षांनी पक्षनेते, पक्ष कार्यक्रमाचे पोस्टर्स, बॅनर्स व झेंडे लावले होते. या पोस्टर व बॅनर्समुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागताच महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोस्टर, बॅनर्स व पक्षाच्या झेंड्यावर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई करीत काढून टाकले. तसेच यापुढे थेट गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. काही झोपडपट्टी परिसर अंतर्गत बॅनर्स जैसे थे असल्याचे बोलले जात असून त्यावरही कारवाई करण्याची प्रतिक्रिया विभाग प्रमुख शिंपी यांनी दिली.
शहरातील गोलमैदान, १७ सेक्शन, नेताजी चौक, शांतीनगर, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल, महापालिकेने मंजुरी दिलेल्या जागी महापालिकेच्या परवानगी विना पोस्टर व बॅनर लावू नये. असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले. निवडणूक काळात अप्रिय घटना टाळण्यासाठी शहरातील प्रमुख राजकीय पक्षनेते व पदाधिकारी यांच्या सोबत पोस्टर, बॅनर्स व झेंडे लावण्याबाबत संवाद साधण्यात येणार असल्याचेही शिंपी म्हणाले. शहर पोस्टर, बॅनर्स व झेंडे मुक्त झाले असून निवडणुकी प्रक्रिया पर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचे शिंपी म्हणाले.