उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात ऑन कॉल डॉक्टरांचे प्रकरण गाजत असतांनाच आमदार कुमार आयलानी यांनी रुग्णालयातील विकास कामाचा आढावा घेतला. रुग्णालयाचे सुशोभीकरण अर्धवट स्थितीत असून शवागृह, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया विभागाचे काम अर्धवट असल्याचे उघड झाले.
उल्हासनगरातील मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात गोरगरीब व गरजू नागरिकांना उपचार लवकर मिळण्यासाठी राज्य शासन आरोग्य विभाग मोठया प्रमाणात निधी देते. मात्र दिलेला निधी योग्य ठिकाणी खर्च झाला की नाही. याची जबाबदारी रुग्णालय जिल्हाचिकित्सक तसेच लोकप्रतिनिधी यांची आहे. रुग्णालयातील वार्तानुकुलीत शवागृह गेल्या अनेक महिन्या पासून बंद असून मृतदेहाची हेडसांड होत आहे. अद्यावत वार्तांनुकुलीत शवागृहाची दुरुस्ती गेल्या दोन महिन्यापासून सुरू असूनही काम अर्धवट आहे. तसाच प्रकार डोळ्याच्या शस्त्रक्रिया विभागा बाबत झाला आहे. अंतर्गत रस्ते, रुग्णालयाचे सुशोभीकरणाचे काम झाली की नाही अशी स्थिती आहे. गेल्या महिन्यात आमदार बालाजी किणीकर यांनी याबाबत झाडाझडती घेऊनही जिल्हाचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांना सूचना केल्या होत्या. मात्र आमदार किणीकर यांची पाठ फिरताच जैसे थे काम रुग्णालयाचे सुरू आहे.
मध्यवर्ती रुग्णालयाचे सुशोभीकरण, शवागृहाची दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, डोळ्याचा शस्त्रक्रिया विभाग आदींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात. मात्र कोट्यावधीची कामे कासवगतीने सुरू असल्याने, विकास कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. आमदार कुमार आयलानी यांनी विकास कामाचा आढावा घेऊन कामे त्वरित करण्याचे आदेश दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उभ्या केलेल्या बहुतांश कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. तहसील कार्यालय जवळ उभारलेल्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन होण्यापूर्वीच तडे गेल्याचा व गळती लागल्याचा आरोप होत आहे. तसेच प्रांत कार्यालय येथील प्रशासकीय इमारत, दसरा मैदान येथील क्रीडा संकुल यांच्या विकास कामाबाबतही प्रश्नचिन्हे उभे ठाकले. या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावरील कारवाईच्या मागणीने जोर पकडला आहे.