सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे नुतनीकरण व रंगरंगोटी करून प्रवेशद्वाराचे उदघाटन न्यायाधीश व्ही एच चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. नूतनीकरण व दुरुस्तीमुळे न्यायालयाचे रुपडे पालटले असून प्रवेशद्वारामुळे न्यायालयाला वेगळी ओळख निर्माण झाले.
उल्हासनगर कॅम्प नंबर-३ येथील चोपडा या परिसरात गेल्या ४५ वर्षांपूर्वी न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी इंग्रज कालीन बॅरेकमध्ये न्यायालयाचे कामकाज चालत होते. पुढे या बॅरेकच्या ठिकाणी प्रशिस्त इमारतीत रूपांतर झाले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीचे नुतनीकरण, दुरुस्ती व रंगरंगोटी झाली नसल्याने, इमारतीला अवकळा आली होती. अखेर न्यायालयाचे नुतनीकरण, रंगरंगोटी व दुरुस्ती झाल्याने, न्यायालयाला वेगळीच झळाळी मिळाली. न्यायालय समोर प्रवेशद्वार उभारले असून त्यांचे उदघाटन न्यायालयाचे न्यायाधीश व्ही एच चव्हाण यांच्या हस्ते झाले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड एस जी रणदिवे, वकील फोरमचे अध्यक्ष अँड धम्मपाल तिडके, न्यायाधीश लाड, नमाने, नमराठे, भाटकर,बाबसरकर, साळवी, चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने वकील संघटनेचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते.