उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर बुधवारी रात्री साडे बारा वाजता व्हीनस चौकात खुनी हल्ला झाला. मारहाणीवेळी बघ्याची गर्दी झाल्याने हल्लेखोरांनी इनोव्हा गाडीतून पळ काढला असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर ओटी सेक्शन परिसरातून टोनी सिरवानी साई पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. बुधवारी रात्री 12 वाजता सहकारी नगरसेवक शेरी लुंड यांना बंगले परिसरात घरी सोडून व्हीनस चौकातून घरी परत जातेवेळी, चौकात टोनी यांच्या गाडी समोर इनोव्हा गाडी लावून सात जणांच्या टोळक्याने हल्ला चढविला. मात्र, नेहमी वर्दळीच्या चौकात हाणामारी सुरू झाल्याने बघ्यांनी गर्दी केली. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. टोळी पैकी एकाच्या हातात पिस्तूल तर दुसऱ्याच्या हातात तलवार होती. टोनी यांच्यावरील हल्ल्याचा सर्वच पक्षांनी निषेध व्यक्त केला असून हल्ल्याबाबत तर्क वितर्क काढण्यात येत आहे. टोनी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
खुनी हल्ल्यात जखमी झालेले टोनी सिरवानी हे स्थायी समिती सभापती पदाचे मुख्य दावेदार होते. साई पक्षाकडून त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप एकत्र आल्याने टोनी यांचे नाव मागे पडून ओमी कलानी टीमचे राजेश वधारिया यांचे नाव चर्चेत आले. स्थायी समिती सभापतीं पदाची निवडणूक 21 मे रोजी असून 17 मे रोजी अर्ज भरण्याची तारीख आहे. यातूनच हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात शेरी लुंड यांची महापालिका सभागृह नेते पदी निवड झाली आहे.
शिवसेनेसोबत केलेला घरोबा अंगलटओमी कलानी टीमच्या पंचम कलानी महापौर होऊ नये म्हणून, टोनी सिरवानी यांच्यासह साई पक्षाच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेसोबत घरोबा केला. बंडखोर साई गटाच्या ज्योती भतीजा यांना महापौर करण्याचा डाव टोनी यांचा होता. पण ऐन वेळी 7 नगरसेवकांपैकी शेरी लुंड पुन्हा सत्ताधारी भाजपातील साई पक्षात परत गेल्याने, टोनी यांचा डाव फसून पालघर येथील फार्महाऊस येथे टोनीसह समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्याना शिवसैनिकाकडून शिवीगाळ व मारहाण झाल्याची चर्चा रंगली होती.