उल्हासनगर : शहरातील मृतप्राण्यावर शवदाहिनी द्वारे अंत्यसंस्कार होणार असून शांतीनगर येथील एटीपी प्लांट शेजारी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन झाले. सद्यस्थितीत मृत प्राण्यावर डम्पिंग ग्राऊंडवर उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहे.
उल्हासनगरातील मृत प्राणी डम्पिंग ग्राऊंड परिसरात टाकले जात असल्याने, परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी केला. मृत प्राणी उघड्यावर न फेकता त्यावर शास्त्रोक्त अंत्यसंस्कार होण्यासाठी महापालिकेने केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोग अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मृतप्राण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी शवदाहिनी खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका आरोग्य विभागाने सादर केला होता. अखेर मंजूर झालेल्या ९० लाखाच्या निधीतून इलेक्ट्रिकल व गॅसवर चालणाऱ्या शवदाहिनी खरेदीची प्रक्रिया सुरू झाली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते शांतीनगर येथील एटीपी प्लांट शेजारी प्राण्यांच्या शवदाहिनी केंद्र भूमिपूजन झाले. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवाळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.