उल्हासनगर : महसूल वसुली, कायदा व सुव्यवस्था नैसर्गिक आपत्ती, निवडणूक सर्व कामकाज व महाराजस्व अभियान अंतर्गत कार्यक्रम तसेच इतर कामकाजात उत्कृष्टपणे काम केले म्हणून प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांना जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते विशेष प्रशिस्तपत्राने सन्मानित केले आहे. सोमवारी कारभारी यांची बदली मुंबई निवासी उपजिल्हाधिकारी पदी झाली आहे.
उल्हासनगर प्रांत अधिकारी पदाचा पदभार जयराज कारभारी यांनी स्वीकारताच, त्यांनी कुशिवली धरणग्रस्त शेतकर्यांचे पैसे इतरजण लाटत असल्याचे भिंग फोडले. यामध्ये कार्यालयाच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह अनेकवार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच शहरातील खुल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये म्हणून शासनाचे नामफलक लावून त्याला संरक्षण भिंत बांधून घेतल्या. महापालिकेच्या ताब्यातील १ हजार ५५ मालमत्तेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून, त्याची मोजणी करून सनद देण्याची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत २५ पेक्षा जास्त महापालिका मालमत्तानां सनद मिळाली आहे. प्रांत कार्यालयाचा पारदर्शक कारभार केल्याने, सर्वच पक्ष नेत्याच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांच्या कामाची दखल राज्य शासनाने घेतली. जिल्हाधिकारी किशोर शिनगारे यांनी जिल्ह्यात महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्या बद्दल प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांचे विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. कारभारी यांचे ठाणे येथे विशेष प्रशिस्तपत्र देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान होत असताना, दुसरीकडे त्यांची मुंबई निवासी उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. कारभारी यांची कमीतकमी एक वर्ष बदली व्हायला नको होती. अशी प्रतिक्रिया शहरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आहेत.