उल्हासनगर: कॅम्प नं-५ खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंडला सोमवारी सायंकाळी आग लागल्याने, २ कि.मी. परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. या धुराने नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला असून डम्पिंग हटविण्याच्या मागणीने पुन्हा उचल खाली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडीखदान डम्पिंग ग्राऊंडला सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. डम्पिंगला आग लागल्याची माहिती महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांना मिळल्यावर त्यांनी पथकाला घटनास्थळी पाठवून पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचें प्रयत्न केले. मात्र रात्रभर आग धुमसत होती. १० पेक्षा जास्त पाण्याचा टँकरचा उपयोग करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख्य बाळू नेटके यांनी दिली असून लवकरच आग नियंत्रणा येण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत चर्चा करून वेगळी उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहे.
कॅम्प नं-५ डम्पिंग ग्राऊंड परिसरातील २ की.मी. लांब परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिकांनी डम्पिंग दुसरीकडे हलविण्याची मागणी केली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले असून आग संपूर्ण डम्पिंग ग्राऊंडवर पसरली आहे. आगीच्या धुराने हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. महापालिका अधिकाऱ्यांनी डम्पिंगला भेट देऊन आग विझविण्याचे आदेश दिले आहे.