सदानंद नाईक उल्हासनगर : व्यापाऱ्यांचा विरोध असतांना शहरात विकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळून सर्वत्र शुकशुकाट होता. काही ठिकाणी दुचाकीस्वार, रिक्षाचालक व पोलिसात नियमाचे उल्लंघनावरून तू तू मैं मैं झाल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे सफाई कामगार, पोस्टमन, गॅस वितरणची कामे नेहमी प्रमाणे सुरू होती.
उल्हासनगर औधोगिक शहर असून जपानी, गजानन मार्केट, फर्निचर मार्केट, बॅग मार्केट, गाऊन मार्केट, जीन्स मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, सोनार गल्ली मार्केट राज्यात नव्हेतर देशात प्रसिध्द आहेत. शेकडो नागरिक येथे खरेदी करण्यासाठी येतात. यातूनच व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन करण्याला विरोध केला. विकेंड लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला विठ्ठलवाडी पोलिसांसह इतर पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी आपआपल्या हद्दीत रूटमार्च काढून लॉकडाऊन बाबत नागरिकांना माहिती देऊन नागरिक व व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहाड फाटक परिसर, बिर्ला गेट चौक, शहाड, उल्हासनगर व विठ्ठलवाडी पोलीस ठाणे रेल्वे स्टेशन, गोल मैदान, शिवाजी चौक, १७ सेक्शन चौक, श्रीराम व पवई चौक, नेहरू चौक, व्हीनस चौक, भाटिया चौक, नेताजी चौकसह मुख्य बाजारपेठेत शुकशुकात होता.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक वृद्ध ऐन दुपारी हातात जेवण घेऊन जात असताना, चक्कर येऊन रस्त्यावर पडला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी वृद्ध इसमाला उचलून सावलीत बसून पाणी दिले. त्यांची सविस्तरपणे चौकशी करून घरी सोडण्याचे आश्वासन दिले. शहरात सर्वत्र शुकशुकाट असतांना पोस्टमन दादा व ताई आपले कर्तव्य तापत्या उन्हात पार पडताना दिसले. तर सफाई कामगारानी आपले कर्तव्य पार पाडीत शहराला स्वच्छ ठेवल्याचे चित्र होते. घरगुती गॅस कर्मचारी घरोघरी गॅस पुरविण्याचे काम करीत होते. दुसरीकडे नेहमी प्रमाणे कामा व्यतिरिक फिरणाऱ्या दुचाकीस्वार व रिक्षाचालकांना जादा सवारी बाबत हटकताचा पोलीस व दुचाकीस्वार, रिक्षाचालकांत तू तू मैं मैं झाल्याचे चित्र होते.
पोलिस रस्त्यावर, महापालिका कर्मचारी गायब?
विकेंड लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी भर उन्हात पोलीस रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत होते. मात्र त्यांच्या सोबतीला नेहमी असलेले महापालिका कर्मचारी, प्रभाग अधिकारी आज गायब झाल्याचे चित्र होते. महापालिका प्रशासनाने याबाबत दखल घेण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.