अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
काय घडली घटना?
भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली.