उल्हासनगर : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक रस्ते व नाले दुरुस्तीची कामे अर्धवट असल्याने, पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच गोलमैदान, राजीव गांधीनगर, आयटीआय कॉलेज आदी परिसरात पाणी साचल्याने नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे.
उल्हासनगरात एमएमआरडीए व महापालिके अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू आहेत. रस्त्याचे कामे केल्यानंतर रस्त्या लगत नाल्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. नियमानुसार रस्त्याचे काम झाल्यानंतर, त्या लगतच्या नालीचे काम केले जाते. मात्र याउलट प्रकार शहरात सर्रासपणे सुरू असल्याने, रस्त्याची दुरावस्था उघड झाली. पावसाळ्यापूर्वी शहरातील लहान-मोठ्या नाल्याच्या साफसफाईचा ठेका दिला जातो. तसेच रस्स्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही प्रभाग समिती निहाय्य खाजगी ठेकेदाराला दिले जाते. मात्र यावर्षी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम झाले नसल्याने, रस्त्यात खड्डे अवतरले आहे. तर दुसरीकडे १५ जून पर्यंत नाले सफाई ९० टक्के पेक्षा जास्त झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली होती. मात्र पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडून नालेसफाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले.
शहरातील गाऊन मार्केट रस्त्याची नाली, भाटिया चौक, कारा मोटर्स रस्ता, मराठा सेक्शन स्टेशनकडे जाणारे रस्ते, बेवस चौक, कॅम्प नं-४ येथील स्मशानभूमी समोरील रस्ता, सी ब्लॉक, डॉल्फिन रस्ता, खेमानी परिसर रस्ते आदी रस्त्याचे काम झाले असून रस्त्या लगत नाल्याचे काम सुरू आहेत. पावसाळ्या पूर्वी नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने, त्यामध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच धोकादायक झाडाचे सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने, झाडे पडून नुकसान होण्याची शक्यता आहे. उल्हासनगर पश्चिम कडून रेल्वे स्टेशनला येण्यासाठी एकमेव सीएचएम कॉलेज समोर वालधुनी नदीवर पूल जुना झाला असून तीन चाकी व चारचाकी वाहनाला बंदी असूनही पुलावरून या गाड्याची ये-जा आहे. तसेच संजय गांधीनगर येथील पुलाच्या कामाला अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याने चाकरमानी व नागरिकांचे हाल होत आहे.
नाला काटावरील गाळ पुन्हा नाल्यात? महापालिकेने ठेकेदाराद्वारे नाले सफाई करण्यात आली असून नाल्यातून काढलेला गाळ नाला किनारी पडून होता. पाहिल्यांच पावसात किनाऱ्यावरील गाळ नाल्यात वाहून गेल्याचे बोलले जात आहे.