सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका दफ्तरी नोंद नसलेला गांधीरोड येथील जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? असा प्रश्न कायम आहे. महापालिका जीर्ण पुतळा हलवितही नाही अथवा पुनर्बांधणी करीत नसल्याची ओरड स्थानिक नागरिकांची आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, गांधीरोड परिसरात एक अज्ञात पुतळा कोणीतरी उभारला असून पुतळा अतिशय जीर्ण झाला आहे. या पुतळ्याची नोंद महापालिका दफ्तरी नसून पुतळा जीर्ण झाल्याच्या तक्रारी काही वर्षांपूर्वी महापालिकेकडे गेल्यावर शिवसेनेचे राजेंद्र चौधरी यांनी पुतळा कोणाचा आहे. याबाबत महापालिकेकडे माहिती मागितली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी पुतळा सिंधी संतांचा असल्याचे उत्तर दिले होते. असे चौधरी यांचे म्हणणे आहे. पुतळा सिमेंट काँक्रीटने बांधल्याने, नेमका पुतळा कोणाचा याचा बोध होत नाही. महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप जाधव यांनी पुतळा जीर्ण झाल्याची माहिती संबंधित प्रभाग समितीला दिली होती. तसेच पुतळा हलविण्यास सांगितला होता. असे जाधव यांचे म्हणणे आहे. तर पुतळा जीर्ण होऊन त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. मात्र अद्यापही पुतळ्या बाबत कोणतीही कारवाई महापालिका बांधकाम विभागाकडून केली नसल्याचे उघड झाले आहे.
महापालिका प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांना याबाबत संपर्क केला. मात्र संपर्क झाला नाही. तर मनसेचे बंडू देशमुख यांनी जीर्ण पुतळ्या बाबत आवाज उठविला होता. असे सांगितले. मात्र महापालिकेने अद्यापही कोणतीच कारवाई केली नाही. महापालिका पुतळा पडण्याची प्रतिक्षा करते का? असा रोखठोक प्रश्न देशमुख यांनी केला. प्रभाग समिती कार्यालय क्रं-४ चे प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी पुतळ्याचा विषय महापालिका बांधकाम विभागा अंतर्गत येत असल्याचे सांगितले. एकूणच जीर्ण पुतळ्या बाबत बहुतांश जण अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे.
पुतळ्याला कापडाने गुंडाळले- पुतळा अतिशय जीर्ण झाला असून त्याचा एकएक भाग गळून पडत आहे. पुतळ्याची विटंबना होऊ नये म्हणून स्थानिक नागरिक व समाजसेवकांनी पुतळ्या भोवती पांढरा कापड गुंडाळून ठेवला आहे.