सदानंद नाईक, उल्हासनगर : नांदेड व संभाजीनगर रुग्णालया सारखी घटना मध्यवर्ती रुग्णालयात टाळण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश तपासे व मनसे पदाधिकार्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी रुग्णालयात ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून दररोज शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची दररोजची एकून संख्या १ हजार ५०० पेक्षा जास्त असून २०० खाटाच्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण भरती असल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. रूग्णालयात मंजूर १६ तज्ञ डॉक्टर पैकी १० पदे रिक्त आहेत. वर्ग-१ डॉक्टरांच्या २९ पैकी ९ पदे, तांत्रिकची ४० पैकी ११ पदे, लिपिकाच्या १९ पैकी ४ पदे, परिचारिकेच्या १३४ पैकी ४२ तर वॉर्डबॉय, मजुरांच्या १४९ पैकी ६७ पदे रिक्त असल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली आहे.
मध्यवर्ती रुग्णालयात ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असून वाढत्या रुग्णांचा ताण डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांवर पडला आहे. तसेच रुग्णालयात अस्वछता असल्याने, सामान्य नागरिक काही मिनिट रुग्णालयात थांबू शकत नाही. असा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनीं केला. तर मनसेचे बंडू देशमुख यांच्यासह पक्ष पदाधिकार्यांनी रुग्णालयाची पाहणी करून औषध तुटवडा, रुग्णांना देण्यात येत असलेली सेवा, रुग्णालयातील अस्वछता आदिवर प्रश्नचिन्हे उभे केले. राज्य शासनाने वेळीच मध्यवर्ती रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे लक्ष दिले नाहीतर, येथेही ठाणे-कळवा, संभाजीनगर, नांदेड रुग्णालया सारखी घटना घडण्याची भीती महेश तपासे यांच्यासह मनसे पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
रुग्णांची होत आहे, हेडसांड
मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची ४० टक्के पदे रिक्त असतानाही वाढत्या रुग्णांना सेवा देण्यात त्यांची दमछाक होत आहे. तर डॉक्टरां अभावी रुग्णांची हेडसांड होत असल्याचे चित्र रुग्णालयात असल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून होत आहे.