- सदानंद नाईक उल्हासनगर : नववर्षाच्या पहाटे रिक्षातून फिरणाऱ्या एका टोळक्याने लुटण्याचा उद्देशाने चौघावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार उघड झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून विट्ठलवाडी पोलिसांनी आतांक निर्माण करणाऱ्या काही जणांना जेरबंद केल्याची माहिती विट्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
उल्हासनगरात गुन्हेगारी, हाणामारीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. आशेळेगाव परिसरात राहणारे १८ ते २१ वयोगटातील टवाळ मुले हातात तलवारी, चोपर, चाकू असे शस्त्र घेऊन बुधवारी पहाटे साडे तीन वाजता रिक्षातून फिरत होते. यावेळी त्यांना रस्त्यातून जे भेटतील त्यांना लुटून विरोध करणाऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. कॅम्प नं-३ परिसरात विरोध करणार्यांवर तलवारीने हल्ला करून जखमी केले. तसेच कॅम्प नं-४ येथील रवी निरभवने, विद्याधर पांडे व रोहित पंडित यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी याबाबत तपास चक्र फिरून काही जणांना जेरबंद केल्याची माहिती दिली. जेरबंद केलेल्या टोळक्याकडे शस्त्र असून त्यांनी रस्त्याने फिरून किती नागरिकांना लुटले. याबाबत चौकशी करण्यात येत आहे. मध्यरात्री सर्वांना अटक करून गुन्हा दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.