उल्हासनगर : उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी सहायक आयुक्त मनीष हिवरे आणि दत्तात्रय जाधव यांना निलंबित केले. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत अडथळा आणल्याबद्दल शिवसेनेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना नगरसेवक पद रद्द का करू नये, अशी नोटीस बजावल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वातावरण तणावपूर्ण आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राजकीय-प्रशासकीय वादाचे फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे.अतिक्रमण विभागाचा पदभार जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याकडे सोपवला असून यापूर्वी त्यांनी केलेली धडाकेबाज कारवाई चर्चेत राहिली आहे. उल्हासनगरमधून जाणाºया अंबरनाथ-कल्याण रस्त्याचे रूंदीकरण हा कळीचा मुद्दा आहे. आयुक्तांनी १३ आॅक्टोबरला या रस्ता रूंदीकरणातील अवैध बांधकामाची पाहणी करून एक बांधकाम पाडण्याचे आदेश भदाणे यांना दिले. तेव्हा संतप्त दुकानदारांनी पाडकामाला विरोध करून शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याकडे मदत मागितली. चौधरी यांनी दुकानदारांबाबत आयुक्त दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. तसेच रूंदीकरणातील बांधकामाबाबत वेगवेगळी भूमिका का घेता, असा प्रश्न केला. आयुक्तांच्या कार्यालयात दुकानदार आणि आयुक्तांची तू तू मैं मैं झाली. त्याच दिवशी आयुक्तांनी अवैध बांधकामाला जबाबदार धरून प्रभाग २ व ३ चे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय जाधव आणि मनीष हिवरे यांना निलंबनाची नोटीस दिली आणि अवैध बांधकामांवर कारवाई होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे दुकानदारांत खळबळ उडाली आणि त्यांनी राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले. मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून आयुक्त व पालिकेविरोधात निवेदन दिले.तसेच रस्ता रूंदीकरणातील अवैध बांधकामांवरील कारवाईत अडथळा आणल्याचा ठपका ठेवत शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना पद रद्द का करू नये, अशी नोटीस पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले. या प्रकाराने ऐन दिवाळीत आयुक्त आणि शिवसेनेत सामना रंगला. दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे रूंदीकरण होऊनही २५ ते ३० दुकानदार न्यायालयात गेल्याने या रस्त्याची बांधणी रखडली आहे.दिवाळीनंतर पाडकाम; पुन्हा भदाणे यांचे काम गाजणार?जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याकडे आता अतिक्रमणांसह शिक्षण विभाग, पदपथ आदी विभागांचा पदभार आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार बांधकामे पाडणार असल्याची प्रतिक्रिया भदाणे यांनी दिली. यापूर्वीही भदाणे यांनी अवैध बांधकामावर कारवाई केली असून त्यांच्यावर अनेकदा जीवघेणा हल्ला झाला. त्यांना पालिकेच्या प्रांगणात गाडीसह जाळण्याचा प्रयत्न झाला.एकदा प्रभाग समिती चारच्या कार्यालय परिसरात त्यांच्या गाडीवर मोठा दगड टाकला होता. पाडकाम कारवाईवेळी माजी आ. पप्पू कलानी, सेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह अन्य लोकांनी त्यांना मारहाण केली होती. गेल्या महिन्यात त्यांनी मालमत्ता कर विभागातील घोटाळा उघड केल्यावर त्यांची राजकीय हेतूने उचलबांगडी केल्याची चर्चा आहे.खड्ड्याला आयुक्तांचे नाव : उल्हासनगरच्या रस्त्यातील खड्डयांच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी आंदोलन करून खड्डयांना आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचे नाव दिले. रस्ते दुरस्ती व खड्डे भरण्यासाठी ऐन पावसाळयात निविदा काढली. स्थायी समितीने अत्यावश्यक कामाच्या नावाखाली साडेपाच कोटीच्या कामाला मंजुरी दिल्याने गदारोळ झाल्याने, आयुक्तांनी निविदा काढली. ती १३ कोटीची असल्याने प्रकरण फेरनिविदेवर गेले. त्यामुळे रस्ते दुरूस्ती व खड्डे भरण्यास वेळ लागत असल्याने आयुक्त लक्ष्य झाले. त्याच्या निषेधार्थ सेनेने खड्डे भरण्यासाठी आंदोलन करत खड्ड्यांचे नामकरण ‘आयुक्त राजेंद्र निंबाळकर तलाव’ असे केल्याने सेना विरूद्ध आयुक्त असा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
उल्हासनगरला नेते-आयुक्तांत फटाके, अनधिकृत बांधकामांचा विषय : दोन अधिकारी निलंबित, शिवसेनेच्या शहरप्रमुखाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 6:25 AM