लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कोरोनाकाळात उत्कृष्ट काम केल्याप्रकरणी उल्हासनगर मनपाला मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड यांच्यातर्फे ‘हेल्थकेअर हिरो ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महापौर लीलाबाई अशान, अतिरिक आयुक्त करुणा जुईकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी हा पुरस्कार महापौर दालनात स्वीकारला आहे.
मनपाने केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली नाही. तसेच मृत्युदरही कमी आहे. मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड (सीएसआर) यांनी त्याची दखल घेऊन मनपाचा हेल्थकेअर हिरो ऑफ इंडिया या पुरस्काराने गौरव केला. डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘आयुष्मान भारत’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण आणि सिप्ला फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रुमाना हमीद यांच्या पॅनेलने विजेत्यांची निवड केली.
उल्हासनगर मनपाने स्वतःचे रुग्णालय नसतानाही राज्य सरकारचे प्रसूतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच शांतीनगर येथील साई प्लॅटिनियम हे खासगी रुग्णालय भाड्याने घेऊन कोरोना रुग्णांवर उपचार केले. तसेच स्वतःचे रिजेन्सी अंटेलिया येथे २०० बेडचे रुग्णालय उभे करण्यात येत आहे. रुग्णांवर उपचार होण्यासाठी महापालिकेने डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदींची तात्पुरत्या स्वरुपात भरती केली. तसेच महापालिकेची आरोग्य सेवा निरंतर सुरू राहण्यासाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी हवेत, अशी मागणी सर्वस्तरांतून होत आहे.
------------------------