उल्हासनगर : महापालिकेत सत्तेसाठी शिवसेनेने साई पक्षाला महापौर पदाची आॅफर देताच भाजपा आक्रमक झाली. महापौर भाजपाचाच होणार असून साई पक्ष भाजपासोबतच असल्याची ग्वाही पक्षाचे प्रदेश सचिव प्रकाश माखिजा यांनी दिली. महापौर भाजपाचा होणार असल्याने साई पक्ष पदासाठी शिवसेनेसोबत जाऊ नये म्हणून आता त्यांना उपमहापौरपद देण्याचे संकेत भाजपाने जाहीर करून टाकले. उल्हासनगरात सत्तेसाठी शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरु आहे. भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले नसल्याने त्यांनी ११ नगरसेवक असलेल्या साई पक्षाचा पाठिंबा घेतला. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी मुख्यमंत्र्याच्या भेटीत बिनशर्त पाठिंबा दिल्याचे सांगितले. मात्र कोणतेही पद मिळत नसल्याने साई पक्षात नाराजी पसरल्याने इदनानी यांची घालमेल वाढली. याचा फायदा शिवसेनेने घेत सत्तेसाठी साई पक्षाला महापौरपदाची आॅफर दिली. तोंडाजवळ आलेला घास शिवसेना हिसकावेल की काय? अशा भीती भाजपाच्या वरिष्ठांसमोर होती. ओमी कलानी टीमला भाजपात प्रवेश घेण्यात तसेच साई पक्षाचा पाठिंबा मिळविण्यात सिंहाचा वाटा पक्षातील निष्ठावंत माखिजा, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, राम चार्ली, महेश सुखरामानी, डॉ. प्रकाश नाथानी यांचा आहे. साई पक्ष भाजपासोबत असून महापौर भाजपाचा तर उपमहापौर साईपक्षाचा असेल, अशी माहिती माखिजा यांनी दिली. मात्र स्थायी समिती सभापतीपद कुणाकडे राहील, याबाबत वरिष्ठ निर्णय घेणार असल्याचे माखिजा म्हणाले. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपाला सत्तेसाठी पाठिंबा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. सत्तेसाठी रिपाइं नगरसेवकांसह भारिपा, पीआरपी, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महायुतीची बोलणी सुरु केली. बोलणी सुरू असताना साई पक्षाला महापौरपदाची आॅफर शिवसेनेने देत सत्ता स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आता शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात महापौर भाजपाचाच
By admin | Published: March 16, 2017 2:58 AM