उल्हासनगर: शहरातील दुकानदारांनी ठळक अक्षरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारां विरोधात मनसेने आंदोलन केले. पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून सुटका केली. उल्हासनगर महापालिकेने मराठी पाट्या ठळक अक्षरात लावण्यासाठी दुकांदारासह इतर आस्थापनाना नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर गुरवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई सुरू केल्याने, दुकानदारात एकच खळबळ उडाली. शनिवारी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहरप्रमुख संजय घुगे यांच्या नेतृत्वाखाली मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारा विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.
यावेळी मनसे पदाधिकारी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवरील इंग्रजी पाटीला काळे फासून तोडफोड केली जाणार होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर, त्यांनी शिवाजी चौकात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या २६ पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असलातरी, मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदार व इतर आस्थापना विरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली आहे.