उल्हासनगर : एमएमआरडीए क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून सोमवारी उल्हासनगरची नोंद झाली असून हवेची गुणवत्ता ३०१ वर गेली. रविवारी रात्रभर फटाक्यांची आतिषबाजी होऊन एकाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने, पोलीस व महापालिका प्रशासनाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महाराष्ट्रात आहे की नाही. असा प्रश्न येथील अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांना पडतो. शासनाने घातलेल्या अटीशर्तीचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याने, शहर बकाल झाले. हवेचे प्रदूषण बघता सायंकाळी ७ ते रात्री १० वाजे पर्यंत फटाके फोडण्याची मुभा दिली. मात्र शहरात मध्यरात्री पर्यन्त कानठळ्या बसणाऱ्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. यावेळी महापालिका अधिकारी अथवा पोलीस कुठेच फिरकतांना दिसले नाही. सर्व कारभार देवभरोसे सुरू होता. रविवारी दिवाळीच्या दिवशी शहरातील हवेची गुणवत्ता २१९ होती. मात्र सोमवारी सकाळी हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये जाऊन ३०१ वर गेली. एमएमआरडीए क्षेत्रात ही हवेची गुणवत्ता सर्वाधिक धोकादायक नोंदविली गेली.
शहरात एकही गुन्हा नाही -शहरात मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना, सोमवारी सकाळी पर्यंत शहरातील एकाही पोलीस ठाण्यात नियमबाह्य फटाके फोडणार्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनावर टिका होत आहे.
शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा ऐन दिवाळीपूर्वी पाऊस पडल्याने, शुक्रवारी व शनिवारी शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन शहर ग्रीन झोन मध्ये आले. मात्र रविवारी दिवाळीच्या दिवसी हवेची गुणवत्ता ऑरेंज झोन म्हणजे २१९ वर गेली. तर सोमवारी सकाळी हीच गुणवत्ता ३०० पार झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेचे सहकार्य नाही दिवाळीत रात्री १० नंतर कानठळ्या बसणाऱ्या फटाक्याची आतिषबाजी झाली. मात्र महापालिकेने सहकार्य न केल्याने, एकही गुन्हा दाखल झाला नाही. अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी खाजगीत देत आहेत.
पोलीसा सोबत महापालिका अधिकारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सोमवार पासून पोलिसासोबत महापालिका प्रभाग अधिकारी गस्त घालणार असल्याची माहिती दिली. फटाके फोडणार्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.
पाच तक्रारीची माहिती -प्रदूषणबाबत काम करणाऱ्या हिराली फौंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी फटाक्यांची आतिषबाजी व हवेतील घसरलेली गुणवत्ताबाबत चिंता व्यक्त केली. तसेच एका दिवशी पाच तक्रारी केल्याची माहिती दिली.