उल्हासनगर सर्वाधिक अस्वच्छ; येत्या आठवड्यात बैठक बोलावून देणार विशेष निधी- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:07 PM2024-01-08T13:07:36+5:302024-01-08T13:13:09+5:30

कोणते प्रकल्प फोडणार वाहतूककोंडी, जाणून घ्या सविस्तर

Ulhasnagar most unsanitary; Special fund to convene a meeting in the coming week - Ajit Pawar | उल्हासनगर सर्वाधिक अस्वच्छ; येत्या आठवड्यात बैठक बोलावून देणार विशेष निधी- अजित पवार

उल्हासनगर सर्वाधिक अस्वच्छ; येत्या आठवड्यात बैठक बोलावून देणार विशेष निधी- अजित पवार

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: शहरात २५ कोटींच्या विकास निधीतील १७ पैकी ९ विकासकामांच्या लोकार्पणासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उल्हासनगर शहर अस्वच्छ असल्याची टिपण्णी केली. शहर स्वच्छतेबाबत शहराचे तिन्ही आमदार व महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच येत्या आठवड्यात बैठक घेऊन विशेष निधी देणार असल्याचे आश्वासन पवार यांनी देऊन हा दादाचा वादा असल्याचे ते म्हणाले.

उल्हासनगर पूर्वेतील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी पक्षाचे तत्कालीन महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री यांना २५ कोटींचा निधी दिला होता. त्या निधीतून एकूण १९ विकासकामे सुरू असून, त्यापैकी एकूण नऊ विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, गणपत गायकवाड, प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.  यावेळी पक्षाच्या सोनिया धामी यांनी शहरातील विविध समस्यांचा पाढा वाचून दाखविला.

हे प्रकल्प फोडणार वाहतूककोंडी

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे गायमुख ते भिवंडी दरम्यान तीन खाडी पूल, ठाणे कोस्टल रोड, शीळफाटा ते माणकोली रस्त्याचे काँक्रिटीकरण, उल्हास नदी आणि देसाई येथे खाडी पूल तयार करणे.
दिवा पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल तयार करणे, कल्याण ते माणकोली बापगाव व गांधारी दोन पदरी पुलांचे चौपदरीकरण करणे, गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणे.
नवी मुंबई ते कल्याण, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि पडघा या गावांना जोडणारा महानगर प्रादेशिक मार्ग बनविणे, दहिसर ते मुरबाड रस्ता, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाची कामे एमएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागांच्या माध्यमातून सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बेकायदा बांधकामे हाेऊ नये

    नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्याच्यातून बेकायदा बांधकामे येथे होत आहेत. ती होऊ नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणे हे पोलिसांचे काम आहे. तिथे राजकीय हस्तक्षेप होऊ न देणे हे राज्यकर्त्यांचे काम आहे. 
    जो कोणी कायदा मोडत असेल त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, अशी सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केल्याचे पवार यांनी म्हारळ येथे सांगितले.

गंगोत्रीच्या कामाचे कौतुक

माजी आमदार पप्पू कलानी यांच्या साम्राज्याला आव्हान देणाऱ्या भारत गंगोत्री यांच्या कामाचे कौतुक अजित पवार यांनी तोंडभरून केले. मात्र, शहराध्यक्षपदाची घोषणा न केल्याने, शहर अध्यक्ष कोण, या चर्चेला उधाण आले आहे. 

भाजप नेत्यांचा भरणा

शहर विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांपेक्षा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भरणा जास्त दिसत होता.

६ जेसीबींच्या मदतीने फुलांची उधळण

उपमुख्यमंत्री पवार यांचे नेताजी चौकात आगमन होताच सहा जेसीबींच्या मदतीने फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी नेताजी गार्डन विकासकामांची पाहणी केली. ५० लाखांच्या निधीतून उभारलेल्या पुष्प गार्डनचे लोकार्पण केले.

Web Title: Ulhasnagar most unsanitary; Special fund to convene a meeting in the coming week - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.