उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शिक्षण मंडळाची झाडाझडती घेतल्यानंतर, शिक्षण मंडळावर अनियमितेचा ठपका ठेवला होता. अखेर शुक्रवारी आयुक्त शेख यांनी प्रभारी प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांना निलंबित केले असून प्रशासन अधिकारी पदाचा पदभार सहायक लेखा परीक्षक अशोक मोरे यांना दिला.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळ नेहमी वादात राहिले असून मागील आठवड्यात आयुक्त अजीज शेख यांनी विभागाची तब्बल तीन तास झाडाझडती घेतली. त्यावेळी आयुक्तांना एकाच विभागात असलेले ५ हजेरीपत्रक, मुलांना देण्यात येत असलेले शैक्षणिक साहित्याचा अभाव, पिण्याचे पाणी, शौचालय आदी नागरी सुविधेचा उडालेला बोजवारा बाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांना लेटलतीफ शिक्षकासह नागरी सुखसुविधाचा उडालेला बोजवारा, असे चित्र दिसले. त्यांनी केलेल्या शाळा पहाणीचा अहवाल आयुक्त शेख यांना दिला.
महापालिका शाळेतील मुलांना शैक्षणिक सुविधासह इतर सुखसुविधाचा अभाव असल्याचे उघड झाल्यावर, आयुक्त अजीज शेख यांनी मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ याना शुक्रवारी निलंबित करण्याचे आदेश काढले. याप्रकारने शिक्षण मंडळातील सावळागोंधळ उघड झाला आहे. अधिक्षक पदी असलेले शेजवळ यांना ३ ते ४ महिन्यापूर्वीच प्रशासन अधिकाऱ्याचा प्रभारी पदभार दिला. त्यामुळे शेजवळ यांना दुसऱ्याने केलेल्या चुका झाकण्यासाठी निलंबित केले. असा मतप्रवाह निर्माण झाला. आयुक्त शेख यांनी दिलेला निलंबित आदेश मागे घ्यावा. अश्या मागणीने जोर पकडला आहे. यापूर्वीच्या प्रशासन अधिकारी व संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच महापालिका शाळा इमारती मध्ये थाटलेले प्रभाग समिती क्रं-३ व ४ चे कार्यालय, खाजगी संस्थेला दिलेली शाळा क्रं-४ इमारत, बेघर निवारा केंद्र शाळेतील मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी खाली करण्याची मागणी होत आहे.