उल्हासनगर : शाळेची शैक्षणिक फी, गणवेश, पुस्तके आदींचे कारण देवून मुलांना ऑनलाईन अभ्यासापासुन वंचित ठेवणाऱ्यां शाळा मुख्याध्यापकावर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे पत्र शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी प्रसिद्ध केले. प्रशांत चंदनशिवे यांनी यांबाबत प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रारीचा पाडा वाचला होता.
उल्हासनगरातील इंग्रजीसह अन्य माध्यमाच्या शाळा मुलांना एसएमएस पाठवून शैक्षणिक फी, गणवेश, पुस्तके आदींची फी भरण्याचा तगादा लावून ऑनलाईन अभ्यासक्रमा पासून मुलांना वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी संघटनेचे काम करणारे प्रशांत चंदनशिवे यांच्याकडे आल्या. त्यांनी महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांना लेखी पत्राद्वारे मुलांच्या समस्या मांडून ऑनलाईन शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली. अखेर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी २ सप्टेंबर रोजी एक पत्र प्रसिध्द केले. शैक्षणिक फी, गणवेश, पुस्तके आदींचे कारण देवून मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळा मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार असल्याचे प्रसिध्दी केलेल्या पत्रात नमूद केले. तसेच मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित केल्याचे उघड झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला.
महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्याच्या फटाव्याने खाजगी शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. लॉकडाऊन काळात हजारो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या असून नागरिकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अश्या वेळी शाळांनी शैक्षणिक फिची शक्ती करणे गैर असल्याची प्रतिक्रिया प्रशांत चंदनशिवे यांनी व्यक्त केली. कोरोना महमारीचा काळ किती दिवस चालतो. हे सांगता येत नसल्याचे चंदनशिवे यांचे म्हणणे आहे. शाळांनी शैक्षणिक फी साठी तगादा लावून ऑनलाईन शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांनी केले आहे. प्रशासन अधिकाऱ्याच्या सतर्कता मुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.