उल्हासनगर : वय वर्ष ४८ पूर्ण झालेल्या महापालिका इमारतीला गळती लागल्याने, आयुक्तांच्या आदेशाने दुरुस्तीचे काम सुरू झाले. इमारत दुरुस्तीसाठी १ कोटीच्या निधीची तरतूद केली असून प्रस्थावित प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पडून आहे.
उल्हासनगर महापालिका मुख्यालय इमारतीचे उदघाटन नगरपरिषद असताना ३ जून १९७६ साली झाले. पुढे १९९६ साली नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. तळमजला अधिक दोन मजले असे इमारतीचे बांधकाम असून काही वर्षांपूर्वी तिसऱ्या मजल्याचे अर्धवट बांधकाम झाले. इमारतीला पावसाळ्यात गळती लागत असल्याने, दरवर्षी इमारतीवर लाखो रुपयांच्या निधीतून प्लास्टिक शेड उभारण्यात येते. मात्र यावर्षी गळतीचे प्रमाण जास्त असल्याने, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत दुरुस्तीसाठी १ कोटीं १७ लाखाची तरतूद केल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता तरुण सेवकांनी यांनी दिली. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या संकल्पनेतून महापालिकेची नवीन प्रस्थावित प्रशासकीय इमारतीचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
महापालिका इमारत प्रवेशद्वाराच्यावरील छताची दुरुस्ती सुरू केली असून अंतर्गत दुरुस्तीच्या कामाचे संकेत बांधकाम विभागाने दिले. महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून नवीन इमारत १५ मजल्याची असणार आहे. त्यासाठी ११० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन प्रस्थावित इमारत बांधण्याचा प्रस्ताव असून महापालिका कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात व्हिटीसी ग्राऊंड येथील बांधण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात हलविण्यात येणार आहे. अशी माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता सेवकांनी यांनी दिली. गेल्या वर्षी पावसाने इमारतीचे सिलिंग व प्लॅस्टर पडण्याचे प्रकार घडले असून यावर्षी तसे प्रकार होणार नसल्याचे संकेत सेवकांनी यांनी दिले.